ऑनलाइन पेमेंट फक्त ओटीपीनेच! एटीएम पिन टाकण्याचा पर्याय बंद, आरबीआयचे निर्देश

डिजिटल पेमेंट्स सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत प्रयत्न करीत आहे. यादृष्टीने रिझर्व्ह बँकेने पेमेंट ऑग्रिगेटर्स आणि पेमेंट गेटवे कंपन्यांसाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. याअंतर्गत ऑनलाईन व्यवहारांसाठी एटीएम पिन टाकण्याचा पर्याय न देता ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्डची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.

ऑनलाईन पेमेंट गेटवे कंपन्यांना देण्यात आलेल्या निर्देशानुसार, दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी आता ओटीपी लागेल. एटीएम पिनमुळे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यावर ओटीपी पर्याय उत्तम आहे. कारण ओटीपी युजरच्या मोबाईलवर थेट जाते. त्यामुळे कुणी दुसरी व्यक्ती ट्रन्झॅक्शन करीत असेल तर लगेच समजू शकते.

रिफंडची रक्कम ग्राहकांच्या खात्यात

आरबीआयने ई- कॉमर्स कंपन्यांना निर्देश दिले आहेत. ऑर्डर रद्द झाली किंवा अन्य कोणत्या कारणाने रिफंड करायची वेळ आली, तर ती रक्कम ज्या खात्यातून पेमेंट करण्यात आले होते, त्या बँक खात्यात किंवा क्रेडीट कार्डमध्ये जमा करावे लागतील. अनेक कंपन्या रिफंड करताना बँक खात्यांऐवजी रक्कम ई- वॉलेट अकाऊंटवर ट्रान्स्फर करतात. या पार्श्वभूमीवर आरबीआयने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.

नोडल अधिकारी नियुक्त करावे लागतील

आरबीआयच्या निर्देशानुसार, पेमेंट ऑग्रिगेटर्सला ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावे लागतील. याशिवाय मोबाईल ऍपवर ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या