
सामना प्रतिनिधी । औसा
औसा तालुक्यातील गोटेवाडी येथील नागरिकांनी गावात पाणी व रस्त्याची सोय होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ईसारा प्रशासनाला एक दिवस अगोदर देऊनही प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने मतदानाच्या दिवशी सायंकाही 6 वाजेपर्यंत गावातील 223 मतदानापैकी केवळ 17 मतदारांनीच मतदान केले. 206 मतदारांनी बहिष्कार टाकला आहे.
जोपर्यंत गावात सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कसल्याही प्रकारच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गोटेवाडी हे चिंचोली जोगण ग्रुप ग्रामपंचायत असून येथील सरपंच चिंचोलीचे तर उपसरपंच हे गोटेवाडी येथील आहेत. या गावात कसल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने येथील गावातील तरुण मतदारात नाराजी पसरली असून आम्ही तहसिलदार यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता आम्हाला गोटेवाडी गावच माहित नाही, असे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे येथील तरुण सांगत आहेत.
गोटेवाडी येथील नागरिकांनी जोपर्यंत गावात पाणी व रस्त्याची सोय होत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

































































