महागाईने प्रत्यक्ष 5 टक्केच पगारवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्षात म्हणजे 2020 साली देशातील कर्मचाऱयांचा पगार 9.2 टक्क्यांनी वाढणार आहे ही नोकरदारांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे, मात्र पगारवाढीच्या आनंदावर महागाईचे विरजण बसेल. महागाईमुळे प्रत्यक्षात पगारात 5 टक्केच वाढ होईल. गेल्या वर्षी हीच वाढ 10 टक्के झाली होती. कॉर्न फेरी ग्लोबल सॅलरी फोरकास्टने हा अंदाज वर्तवला आहे. आशिया खंडातील अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील पगारवाढ चांगली असेल असे भाकीतही करण्यात आले आहे.

कॉर्न फेरी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर पगारात घट होत असताना हिंदुस्थानने भक्कम पगारवाढीची नोंद केली आहे. सध्याची आर्थिक स्थिती आणि सरकारतर्फे केल्या जाणाऱया उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर  हिंदुस्थानच्या विभिन्न सेक्टरमध्ये सकारात्मकता येत आहे. त्यामुळे या सेक्टरमधून पगारवाढ होत आहे.

जागतिक स्तरावर 2020 मध्ये 4.9 टक्के दराने पगार वाढण्याची शक्यता आहे. 2.8 टक्के ग्लोबल इनफ्लेशन रेट अंदाजानंतर रियल वेज सॅलरी 2.1 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त रिअल वेज ग्रोथ आशियामध्ये होणार आहे. आशियात पगार 5.3 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. रियल वेज  3.1 टक्के आणि महागाई दर 2.2 टक्के राहणार आहे.