
हिंदुस्थानला इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन्सचे जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. कारण Oppo, Vivo आणि Xiaomi या प्रमुख चिनी कंपन्यांनी जगभरातील देशांना हिंदुस्थानात तयार करण्यात आलेली उपकरणे निर्यात करण्यास सहमती दर्शवली आहे. यामध्ये त्यांच्या चीनी कारखान्यांमधून तयार केलेल्या वस्तूंचा देखील समावेश असणार आहे.
चिनी कंपन्यांद्वारे मेड-इन-इंडिया स्मार्टफोन्सची निर्यात करण्यासाठी त्यांच्या उत्पादन धोरणात बदल करावा लागणार आहे. चिनी कंपन्या त्यांचे जागतिक उत्पादन हिंदुस्थानसोबत शेअर करण्याची आणि त्यासाठी जागतिक बाजारपेठ खुली करण्याची ही पहिलीच वेळ असेल. आतापर्यंत या कंपन्यांनी यासाठी ठामपणे नकार दर्शविला होता. मात्र आता त्यांनी ही उत्पादने जगभरात निर्यात करण्यास सहमती दर्शविली आहे.
या तीनही प्रमुख चिनी निर्मात्यांनी आता हिंदुस्थानातून निर्यात सुरू करण्याच्या योजनांना अंतिम रूप दिले आहे. याआधी अमेरिकेच्या अॅपल आणि कोरियाच्या सॅमसंग कंपनीने अशीच पावलं उचलली होती. या तीनही कंपन्यांची आफ्रिका, अरब देश, लॅटिन अमेरिका आणि युरोपमध्ये या प्रमुख बाजारपेठ असू शकतात. कोरोनानंतर आणि लडाखमधील तणावानंतर चीनकडून होणार्या गुंतवणुकीला कमी करण्याच्या सरकारच्या रणनीतीमुळे हा बदल करण्यात आला आहे.
सरकारने कंपन्यांसाठी हिंदुस्थानातून स्मार्टफोन निर्यात सुरू करण्यासाठी एक एक योजना आखली आहे. सॅमसंग आणि ऍपल याच योग्यपणे पाठपुरावा करत आहेत. सॅमसंगने या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 2.8 अब्ज डॉलर एवढ्या किमतीचे फोन निर्यात केले. तर हिंदुस्थानात फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनच्या कारखान्यांमध्ये आयफोन तयार केला जातो. ऍपलने येथून 2.2 अब्ज डॉलर्सची उपकरणे जगभरात निर्यात केल्याची माहिती मिळत आहे. त्या तुलनेत या बाजारपेठेत चिनी निर्मात्यांची संख्या नगण्य आहे.



























































