
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील यशवंत शिवाजी खडसे यांनी मुलाकडून औषधोपचार व निर्वाह भत्ता मिळण्यासाठी दिलेला अर्ज मंजूर करुन अमरावती येथे नोकरीस असलेला त्यांचा मुलगा संजय यशवंत खडसे यांनी दरमहा साडे सात हजार रुपये निर्वाह भत्ता वडिलांना द्यावा, असे आदेश हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिले आहेत.
ही रक्कम दरमहा दिली नाही तर या आदेशाचा अवमान केला म्हणून एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा देण्याचा सज्जड इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील यशवंत शिवाजी खडसे यांनी हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधीकरणामध्ये अर्ज दाखल केला होता. यशवंत खडसे हे मोलमजुरीचे काम करत होते, मात्र वयोवृध्द झाल्यामुळे तसेच शारीरिक व्याधीमुळे काम करण्यास सक्षम नसल्याचे आणि त्यांचा मुलगा एमबीए झालेला असून अमरावती येथे नोकरीस असल्याचे अर्जामध्ये नमुद केले होते. मुलासोबत सून देखील एमबीए असून मुलाचे उत्पन्न वार्षिक दहा लाख रुपये असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मुलगा देखभाल व सांभाळ करत नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सूनावणी ठेवली. या सुनावणी दरम्यान १६ फेब्रुवारी २०१९ रोजी संजय खडसे यांनी पुढील संधी देऊन सुनावणीची तारीख वाढविण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतर ते सुनावणीसाठी गैरहजर राहिले. तर यशवंत खडसे यांनी सुनावणीला उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडून निर्वाह भत्ता देण्याची मागणी केली. आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम २००७ च्या कलम ५ व ९ व्दारे मिळालेल्या अधिकारानुसार उपजिल्हाधिकारी चोरमारे यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. यामध्ये यशवंत खडसे यांना दरमहा साडे सात हजार रुपये प्रत्येक महिन्या पाच तारखेपर्यंत बँक खात्यावर व मनी ऑर्डरव्दारे संजय खडसे यांनी द्यावेत, स्वच्छतागृह, स्नानगृहासह सुसज्ज असलेली खोली करुन द्यावी, हिंगोलीच्या ज्योतीनगर भागातील प्लॉट जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु नये, असे आदेश दिले आहेत. यासोबतच या आदेशाचा अवमान केल्यास जेष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७५ चे कलम १२५ (३) अन्वये एक महिन्यापेक्षा अधिक नसेल ईतकी कारावासाची शिक्षा दिली जाईल, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.






























































