माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपलोकायुक्तपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उपलोकायुक्तपदी निवड करण्यात आली आहे. याविषयी राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिक्कामोर्तब केले. राज्याची कायदा-सुव्यवस्था सांभाळल्यानंतर आता लोकसेवकांविरोधातील भ्रष्टाचार तसेच अन्य तक्रारींच्या प्रकरणांच्या सुनावणीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालकपदावरून आठवडाभरापूर्वीच निवृत्त झाल्यानंतर दत्ता पडसलगीकर यांच्यावर उपलोकायुक्तपदाची जबाबदारी राज्य सरकारने सोपविली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषकिल्यानंतर दत्ता पडसलगीकर यांनी 1 जुलै 2018 रोजी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्कीकारला होता. 30 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असतानाच त्यांना राज्य-केंद्र सरकारच्या शिफारशीवरून तीन-तीन महिन्यांची दोनदा मुदतवाढ देण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता, मात्र केंद्राकडून ही मागणी मान्य करण्यात आली नाही.