कोरोनाची लस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

कोरोनाची लस घेतल्यानंतर दोन आठवडय़ानंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावंकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी प्रियंका बोकील यांनाही कोरोनाची लागन झाली आहे. जिल्हाधिकाऱयांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत.

या महिन्याच्या सुरुवातील जिल्हाधिकाऱयांनी कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला होता. जिल्हाधिकाऱयांना अंगात ताप असल्याने त्यांना डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता, त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगिकरणात आहेत.

यानंतर जिल्हाधिकाऱयांनी जिह्यातील नागरीकांसाठी क संदेश दिला आहे. या संदेशात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परिणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे ‘नो मास्क नो एन्ट्री’ मास्क तोंडावरून खाली ओढून बोलणे यावर कडक कार्यवाही आवश्यक आहे.

मी दोन आठवडय़ापूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोरोना विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहा. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या.

पुढे ते म्हणाले की, मला आनंद आहे की, धाराशिव जिह्यात मागील 6 महिन्यात ज्या सोयी सुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे. मागील आठवडाभरात आपण कोविडच्या दुसऱया लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. अँटीजन किट्स, एन 95, नवीन ऑक्सीजन सिलेंडर, नवीन 200 ऑक्सीजन लाईन, 2 डि इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे. 960 ऑक्सीजन बेड्सची सुविधा पुन:स्थापित करण्याचे काम वेगात सुरू करावे. लक्षणे असणाऱया सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे. किंबहुना मी लस घेतली आहे, त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून लोकांना संसर्ग झाला असता.

माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की, कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. काल केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एसओपी प्राप्त झाली आहे. त्या एसओपी आणि राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपण सर्वजण मागील एक वर्षापासून कोविडच्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे. पुढेही करत राहू असेही कौस्तूभ दिवेगावकर यांनी आपल्या संदेशात शेवटी नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या