
नाशिकमध्ये आज मृत्यूने अक्षरशः तांडव घातले. ऑक्सिजनचा पुरवठाच अचानक खंडित झाल्याने 22 रुग्णांनी तडफडून प्राण सोडला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजनच्या टाकीतून मोठय़ा प्रमाणावर गळती झाली. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा प्राणवायूच त्यामुळे खंडित झाला. 11 महिला आणि 11 पुरुष रुग्ण गुदमरले. काय झाले हे कळायच्या आतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डोळ्यासमोर आपला माणूस श्वास कोंडून गेल्याचे नातेवाईकांनी पाहिले. त्यांच्या टाहोंनी अवघे रुग्णालय शोकाकुल झाले. या दुर्घटनेने महाराष्ट्रावर दुःखाचा पहाड कोसळला. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
नाशिकच्या द्वारका परिसरात नाशिक महापालिकेचे 170 बेडचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आहे. येथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आज येथे 157 रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील 15 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. इतर 131 रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. रुग्णालयाच्या आवारातच एका खासगी कंपनीकडून ऑक्सिजन टाकीची उभारणी करण्यात आली आहे. टँकरमधून या टाकीमध्ये ऑक्सिजन भरत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक टाकीतून मोठय़ा प्रमाणावर गळती झाली. यामुळे व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनवरील असलेल्या रुग्णांसाठीचा ऑक्सिजन पुरवठाच खंडित झाला. ऑक्सिजनअभावी या रुग्णांची प्रकृती खूपच गंभीर झाली. डॉक्टरांचे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि नातेवाईकांचा आक्रोश असा एकच हलकल्लोळ माजला. तिकडे टाकीतील गळती रोखण्याचे काम अग्निशमन दल व काही तंत्रज्ञांनी अर्ध्या तासात पूर्ण केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अतिगंभीर असलेल्या व्हेंटिलेटरवरील 11 व ऑक्सिजनवरील 11 अशा 22 रुग्णांना जीव गमवावा लागला. तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातून 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर आणून इतर रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात आला, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
दोषींवर कठोर कारवाई करणार – छगन भुजबळ
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात नक्की दोष कुणाचा हे शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या चौकशीत निश्चित कारण समजेलच. भुजबळांनी रुग्णालयात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व उपाययोजनेच्या सूचना दिल्या.
कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट
कृषीमंत्री दादा भुसे यांनीही रुग्णालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त पैलास जाधव यांच्याशी चर्चा केली.
दोषींवर गुन्हे दाखल करणार
ऑक्सिजन टाक्यांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी प्रकल्प उभारणाऱया पंपनीची होती. ही घटना दुर्दैवी आहे. उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त पैलास जाधव यांनी दिली.
दुर्घटनेतील मृतांची नावे
अमरदीप नगराळे (74), भारती निकम (44), श्रावण पाटील (67), मोहना खैरनार (60), मंशी शहा (36), पंढरीनाथ नेरकर (37), सुनील झळके (33), सलमा शेख (59), प्रमोद वालुकर (45), आशा शर्मा (45), भैय्या सय्यद (45), प्रवीण महाले (34), सुगंधाबाई थोरात (65), हरणाबाई त्रिभुवन (65), रजनी काळे (61), गिता वाघचौरे (50), बापूसाहेब घोटेकर (61), वत्सलाबाई सूर्यवंशी (70), नारायण इरनक (73), संदीप लोखंडे (37), बुधा गोतरणे (69), वैशाली राऊत (46).
मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून आर्थिक मदत
या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीतून दुर्घटनेचे निश्चित कारण शोधून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
ज्या पंपनीने टाक्या उभारल्या आहेत, त्यांनी येथे टेक्निकल स्टाफ ठेवायला हवा होता. संबंधित पंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत गोडसे, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली. त्यांनी कोरोना कक्षात जाऊन परिस्थितीची पाहणी करीत माहिती घेतली.
अशी घडली घटना…
- दुपारी 12 वाजता ऑक्सिजनचा टँकर आला. टँकरमधून ऑक्सिजन टाकीत भरला जात असतानाच गळती होत असल्याचे निदर्शनास आले. टाकीला छिद्र पडले होते. त्यावेळी टाकीत 25 ते 30 टक्के ऑक्सिजन होता.
- टाकीतून पाईपच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जातो. तो पाईप बदलण्यात आला. त्यासाठी दीड तास लागला.
- ‘टाय यो निपोन’ या परदेशी कंपनीमार्फत ही ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे. गळतीची माहिती तातडीने कंपनीला देण्याची धडपड सुरू असतानाच टाकीचे छिद्र प्रचंड दाबामुळे मोठे होऊन गळती वाढली.
- अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.
- टाकीत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन होता. तो उणे 160 डिग्री तापमानात साठवला जातो. 13 केएल क्षमतेची ही ऑक्सिजनची टाकी आहे.





























































