
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तिकिटासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करून तेलंगणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सचिव पी. सुधाकर रेड्डी यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, दुर्दैवाने परंपरा आणि मूल्य यांच्या उलट सध्या पक्षातील परिस्थिती आहे. त्याला पक्षातील दलाल आणि चुकीचे स्थानिक नेतृत्व कारणीभूत असून यामुळे काँग्रेसची छबी खराब झाली आहे.
रविवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माजी सदस्य पी. सुधाकर रेड्डी यांनी राजीनामा दिला. तिकिटाच्या बदल्यामध्ये कोटय़वधींची मागणी केल्याचा गंभीर आरोप रेड्डी यांनी केला. राजीनामा देण्याआधी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये रेड्डी यांनी म्हटले की, 2018 ची तेलंगणा विधानसभा निवडणूक, एमएलसी निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिकिटांसाठी पैशांची मागणी केल्याची प्रकरणे काढली आहेत. रेड्डी पुढे आपल्या पत्रामध्ये म्हणतात की, तिकिटांसाठी पैशांची मागणी होत असल्याचे ऐकून मला धक्काच बसला. तिकिटासाठी झालेल्या या व्यावसायिकरणामुळे मला पक्षाचा राजीनामा देण्यासाठी उद्विग्न केले. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या व्यावसायिकरणाची माहिती मी हायकमांडपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मधल्या दलाल लोकांमुळे माझा आवाज तिथपर्यंत पोहचला नाही.
























































