पुणे तिथे काय उणे! ‘शौकिनां’साठी सुरू झालंय पानाचं एटीएम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्री जेवण उरकून बाहेर पडल्यावर उशीर झाला तर पान कुठे मिळवायचे हा पुणेकरांचा प्रश्न आता कायमचा मिटला आहे. कारण पुण्यातील एका दुकानाबाहेर चक्क ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात आले आहे. त्यामार्फत शौकिनांना कधीही आपल्या आवडत्या पानाचा आस्वाद घेता येईल. नळ स्टॉप येथील शौकिन पान स्टॉलचे मालक शरद मोरे यांच्या संकल्पनेतून हे मशीन बसवण्यात आले आहे.

देशातील हे पहिले पानाचे एटीएम असल्याचा दावादेखील मोरे यांनी केला आहे. या एटीएममधून पान खरेदी करण्यासाठी सुरुवातीला ग्राहकांना त्यांचा मोबाईल मशीनसोबत कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर पानांची यादी येईल. पान सिलेक्ट करून मोबाईलद्वारे पेमेंट केल्यावर निवडलेल्या पानाचा बॉक्स मशीनच्या ट्रेमधून बाहेर येईल. मँगो, चॉकलेट, आईस्क्रीम, मसाला, मघई, ड्रायफ्रूट, वॅनिला, स्ट्रॉबेरी आदी प्रकारची पान या एटीएममध्ये मिळतील. पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यावर भविष्यात पुण्यासह मुंबईत विविध ठिकाणी पानाचे एटीएम सुरू करणार असल्याचे मोरे सांगतात.