पैठण – सालवड ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असताना दोन गटात हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण तालुक्यातील सालवडगाव ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया चालू असताना दोन गटात हाणामारी झाली. यात 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोड येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत.

पैठण तालुक्यातील 106 पैकी 22 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अतिसंवेदनशील व संवेदनशील जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असताना सालवडगाव येथे मात्र या निवडणूकीला गालबोट लागले आहे. या ठिकाणी बोगस मतदानावरून वाद विकोपाला गेल्याचे समजते. यातूनच दोन गट मतदान केंद्राच्या परिसरा बाहेर एकमेकांना भिडले. आणि हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळी पाचोड पोलिसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. तर यात दोन जन जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवींद्र पंढरीनाथ ठोंबरे आणि विनोद रघुनाथ ठोंबरे असे जखमींची नावे आहेत.