Pakistan election results – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या मुलाचा दारूण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून पीटीआय समर्थित आझाद आणि नवाज शरीफ यांच्या पीएमएलएन या पक्षांमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद (Hafeez Saeed) याचा पक्ष पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगनेही अनेक जागांवर उमेदवार जाहीर केले होते. यापैकी एका जागेवर हापिजचा मुलगा तल्हा सईदही (Talha Saeed) उभा होता. मात्र पाकिस्तानच्या जनतेनेही त्याला नाकारले असून त्याचा दारूण पराभव झाल्याचे वृत्त आहे.

हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदा हा लाहोरच्या एनए-122 जागेवरून उभा होता. मात्र या निवडणुकीत त्याचा दारूण पराभव झाला आहे. त्याला केवळ 2042 मतं मिळाली असून निकालात तो थेट सहाव्या स्थानावर राहिला. या जागेवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या लतीफ खोसा यांनी विजय मिळवला. त्यांना 117109 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर पीएमएलएन पक्षाचे उमेदवार साद रफिक राहिले. त्यांना 77907 मतं मिळाली.

नवाज शरीफ विजयी

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे विजयी झाले आहे. लाहोरमधील एनए-130 मधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात पीटीआय समर्थित यास्मीन रशीद या उभ्या होत्या. मात्र नवाज शरीफ यांनी 171024 मतं घेत रशीद यांचा 55 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.