
पाकिस्तानात कबुतर पाळणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तेथे दुर्लभ आणि दुर्मिळ जातीची कबुतरे पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हिंदुस्थानी सीमारेषेजवळ राहणारे काहीजण मात्र कबुतरांच्या हिंदुस्थानप्रेमामुळे त्रासले आहेत. कारण ही कबुतरे हिंदुस्थानात गेली की पुन्हा येण्याचे नावच घेत नाहीत. यातील काही कबुतरे तर एकेक लाख रुपये किमतीची आहेत. साधारण कबुतरे हिंदुस्थानात गेली आणि परत आली नाहीत तरी त्यांच्या मालकांना काही वाटत नाही, पण लाख-लाख रुपयांपर्यंतची महागडी कबुतरे परत आली नाहीत की खूप दुःख होते असे कबुतरप्रेमी रेहान सांगतात. ही कबुतरे वेगवान वार्यामुळे हिंदुस्थानात जातात आणि मग त्यांना परत येण्याचा मार्ग सापडत नसावा, असेही रेहान यांनी पुढे स्पष्ट केले.






























































