भीक मागण्याऐवजी हिंदुस्थानशी मैत्री करा, हीना रब्बानींचा स्वकीयांना उपदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लाहोर 

पाकिस्तानने आर्थिक आणि राजनैतिक किंवा लष्करी स्तरावर अमेरिकेवर अवलंबून राहण्याऐवजी हिंदुस्थानशी संबंध दृढ करणे गरजेचे असल्याचे पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने हिंदुस्थानसह इतर शेजारी राष्ट्रांशीही संबंध सुधारले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. शनिवारी पार पडलेल्या थिंक फेस्ट मधील अमेरिका पाकिस्तान संबंधावरील चर्चेत त्या बोलत होत्या. रब्बानी म्हणाल्या की, “पाकिस्तान आपल्या दोन्ही हातात भिक्षा पात्र ठेवून जगात सन्मान नाही मिळवू शकत.”

पाकिस्तानचे सर्वाधिक चांगले संबंध अमेरिकेशी असण्याऐवजी अफगाणिस्तान, हिंदुस्थान, इराण आणि चीनशी असले पाहिजे असे रब्बानी म्हणाल्या. तसेच अमेरिकेला इतके महत्त्व देणे चुकीचे आहे कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून नाही.

हीना रब्बानी खार या पाकिस्तानच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री होत्या. त्यांच्याच कार्यकाळात अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून २०११ साली ओसामा बिन लादेनच खात्मा केला होता. रब्बानी म्हणाल्या की, “पाकिस्तानने अमेरिकेकडून फार अपेक्षा ठेवता कामा नये. पाकिस्तानने अफगाण युद्धातून बाहेर पडले पाहिजे.” गेली 17 वर्षे हे युद्ध सुरू असून या सगळ्यात पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले.