
अफगाणिस्तानने दिलेली जखम भळभळून वाहतेय. ती जखम प्रत्येक पाकिस्तानीच्या जिव्हारी लागलीय.आता त्या जखमेवर दक्षिण आफ्रिकीरूपी विजयाची फुंकर हवीय. जर ती बसली नाही तर पाकिस्तानी संघाची काही खैर नाही. एकीकडे पराभवाने खचलेला पाकिस्तानी संघ आणि दुसरीकडे विक्रमांचे एव्हरेस्ट गाठत विजय नोंदविणारा दक्षिण आफ्रिकन संघ एकमेकांशी भिडत आहेत. नावाला हा सामना मोठा वाटत असला तरी लढत एकतर्फी झालीय. पाकिस्तानसाठी हा जीत है तो जहांन है. सामन्याचा निकाल त्यांचे भवितव्य निश्चित करणार आहे.
एकेका धक्कादायक निकालांमुळे वर्ल्ड कप आता रोमहर्षक वळणावर येऊन ठेपलाय. सलग विजयांमुळे हिंदुस्थान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकन संघांनी आपले एक पाऊल उपांत्य फेरीत टाकलेय. त्यामुळे चौथा संघ म्हणून ऑस्ट्रेलियन संघाची घोडदौड सुरू झालीय. त्यामुळे अन्य संघांना आपले अस्तित्व दाखवायचे असतील तर विजयाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक सामना त्यांच्यासाठी युद्धच आहे. सध्या पाकिस्तान त्याच चक्रव्यूहात अडकलाय. तो चक्रव्यूह त्याला भेदायचे असेल तर त्यांच्या गोलंदाजांना आपल्या लौकिकाला जागावे लागेल. शाहिन आफ्रिदी, हसन अली, हारिस रऊफ आणि शादाब खान यांना कामचलाऊ नव्हे तर विजय मिळवून देणारा मारा करावा लागणार आहे. फलंदाजीत मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफिक यांनीच सातत्य दाखवलेय. बाबर आझम, इमाम, सऊद शकील यांनाही फॉर्मात यावे लागेल.
आजही आफ्रिकी झंझावात
दक्षिण आफ्रिकेचे वादळ पाचपैकी चार सामन्यांत घोंघावलेय. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांची नुसती वाट लागली होती. क्विंटन डिकॉक, हेन्री क्लासन यांचा धसका पाकिस्तानी गोलंदाजांनी नक्कीच घेतला असेल. उद्या आफ्रिकेने प्रथम फलंदाजी घेतली तर मुंबईचे वादळ चेन्नईच्या समुद्रकिनारीही धडकल्याशिवाय राहणार नाही. आफ्रिका आपला पाचवा विजय मिळवून आपले स्थान निश्चित करण्याच्या ध्येयाने उतरणार आहे. त्यामुळे उद्याही ते पाकिस्तानविरुद्ध दयामाया दाखवतील, अशी अपेक्षा कुणीही बाळगू नये. मुंबईनंतर चेन्नईकरसुद्धा आफ्रिकी वादळात भिजून जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे चेन्नईत कुणाची शिटी वाजते आणि कुणाची वाट लागते, हे पाहणे नक्कीच वादळी असेल.
उभय संघ
– पाकिस्तान ः मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, फखर जमां, मोहम्मद नवाज, बाबर आझम, इमाम उल-हक, उसामा मीर, आगा सलमान, सऊद शकील, हसन अली, अब्दुल्ला शफीक, शादाब खान, शाहीन अफरीदी, अबरार अहमद , हारिस रऊफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम आणि जमान खान.
– दक्षिण आफ्रिका ः रिझा हेंड्रिक्स, डेविड मिलर, टेम्बा बवुमा, रासी वॅन डर डुसेन, क्विंटन डिकॉक, तबरेज शम्सी, केशव महाराज, लिजाड विलियम्स, हेन्रीक क्लासन, पॅगिसो रबाडा, एडन मार्करम, एंडिले फेहलुकवायो, लुंगी एंगिडी, माकाx यानसन.
आजची लढाई
पाकिस्तान
Vs
द. आफ्रिका
वेळ ः दु. 2.00 वा.
लाइव्ह ः स्टार स्पोर्ट्स, डिज्नी हॉटस्टार
























































