दोन शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला, पालघर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षासह साथीदारांवर गुन्हे; अटक करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद सदस्य पद रद्द झालेले पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या पायाखालची वाळू घसरली. सांबरे यांच्यासह काही गुंडांनी विक्रमगडमधील दोन शिवसैनिकांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली असून त्यांचे हात व पाय जायबंदी झाले आहेत.

याप्रकरणी सांबरे व त्यांच्या साथीदाराविरोधात विक्रमगडमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे हे अपक्ष निवडून आले. पालघर जिल्हा परिषदेत त्यांची उपाध्यक्षपदी निवडही झाली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक असलेले ओबीसी आरक्षण रद्द केले. त्याचा फटका सांबरे यांना बसला. त्यांचे सदस्यपद रद्द झाले.

नीलेश सांबरे यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. जिल्हा परिषद सदस्य पद रद्द झाल्याने सैरभैर झालेल्या नीलेश सांबरे यांनी त्यांच्या साथीदारांसह विक्रमगडमधील आदिवासी शिवसैनिक रुपेश डोले आणि मनोज खरपडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना अमानुष मारहाण केली.

या हल्ल्यात दोघांचेही हातपाय संपूर्णपणे जायबंदी झाले आहेत. या घटनेनंतर विक्रमगड पोलीस ठाण्यात कलम 143, 148, 149, 307 तसेच जाती अनुसूचित जाती प्रतिबंधक कलमान्वये सांबरे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  सांबरे व त्यांच्या साथीदारांविरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा सोमवारी पोलिसांविरोधात जोरदार मोर्चा काढून या अन्यायाला वाचा फोडू, असा इशारा आदिवासी युवा संघर्ष समितीने दिला आहे.