…आणि ती शाळेतच बेंचच्या आडोशाला बाळंत झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

“ती” वर्गात आली…प्रचंड भेदरलेली होती. इकडे तिकडे पहात तिने शेवटचा बेंच पकडला आणि त्या बेंचच्या आडोश्यालाच ती बाळंत झाली… वर्गात एकच गोंधळ उडला…शिक्षकांचीही तारांबळ उडाली…गावात बोभाटा झाला… त्यानंतर “तो” आला आणि बाळांसह तिला घेऊन गेला.

ही प्रसुति बुधवारी दुपारी बीड जिल्ह्यातील केतुरा येथील जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शाळेत झाली. सद्या दुर्मिळ होत असलेली एक गाभण उदमांजर सुरक्षित जागा शोधत शोधत शाळेजवळ आली. तोपर्यंत घटिका जवळ आल्याने ती थेट एका वर्गात शिरली आणि तीने एका मागोपाठ एक अशा पाच गोंडस पिल्लांना जन्म दिला. हि बातमी परीसरात पसरताच सगळ्यांनी शाळेकडे धाव घेतली. शाळेचे मुख्याध्यापक संतोष पडुळे आणि पत्रकार अरुण रहाडे यांनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सॅकट्युअरी असोसिएशनचे अध्यक्ष, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनी वरून कळवली. त्यानंतर तात्काळ विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोनवणे व वनविभागाचे कर्मचारी शिवाजी आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

udmanjar

दुर्मिळ उदमांजर आणि पिल्लं पाहिल्यानंतर त्यांना शाळेतच १५-२० राहुद्या. त्यांचा कोणताही उपद्रव होणार नाही. उदमांजर काहीही करत नाही. त्याला भिण्याचे कोणतेही कारण नाही. ते दिवसभर झोपून रहाते व रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडते, असे सिद्धार्थ सोनवणे यांनी शिक्षकांना समजावून सांगितले.

मात्र विद्यार्थी घाबरतात. उदमांजरास तुम्ही घेऊन जा. येथे ठेऊ नका, असे शिक्षकांनी सांगितले. त्यांनतर सिद्धार्थ सोनवणे यांनी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’, तागडगाव येथे संगोपनासाठी पाठवून दिले. या उदमांजर व पिल्लांची देखभाल ‘सर्पराज्ञी’च्या संचालिका सृष्टी सोनवणे ह्या घेत आहेत.

दिवसेंदिवस वन्यजीवांची आश्रयस्थाने कमी होत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा वंश वाढीसाठी, गर्भधारणेनंतर पिल्लं देण्यासाठी सुरक्षित जागेसाठी वन वन भटकंती करावी लागत आहे. बाळंतपणासाठी जागेच्या शोधार्थ केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत आलेले दुर्मिळ उदमांजर हे त्याचेच एक उदाहरण आहे.

उदमांजराचा अधिवास धोक्यात
उदमांजराचा अधिवास हा बहुधा जुनाट मोठया जिवंत व मृत झाडाच्या फांदीवर, झाडाच्या ढोलीमध्ये किंवा डोंगर खडकाच्या, विहिरीच्या कपारीत असतो. याच ढोली व कपारीमध्ये उदमांजरे पिलांना जन्म देतात. मात्र जुनी व मोठमोठी झाडे तोडल्याने, डोंगर कपारीचे उत्त्खनन झाल्याने, विहिरींना मोठे सिमेंट कठडे केल्याने उदमांजरांचा जंगलातील अधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीच्या आश्रयाला येत आहेत. – सिद्धार्थ सोनवणे (वन्यजीव अभ्यासक)