
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात यापूर्वीच रुंदीकरण झाले आहे. आता राज्य शासनाने जाहीर केलेला पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा 65 एकरांत करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिक व व्यापारी यांनी केली आहे. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी आल्यावर पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली होती. याबाबत प्रशासनाकडून वेगाने काम सुरू आहे. या अंतर्गत मंदिराच्या चारही बाजूस दोनशे व त्याहून अधिक फूट रुंदीकरण सुचविण्यात आले आहे. तसेच मंदिराकडे येणाऱया 12 गल्ली-बोळांतदेखील रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिक व व्यापाऱयांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. या प्रस्तावित रुंदीकरणास विरोध करण्यासाठी, तसेच कॉरिडॉरबाबत निर्णय घेण्यासाठी रेणुका देवी मठात बैठक आयोजित करण्यात आली होती. याला 400हून अधिक नागरिक, व्यापारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांनी पंढरपूर कॉरिडॉरचे स्वागत केले; परंतु यापूर्वी मंदिर परिसरात रुंदीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांची संपूर्ण घरे बाधित झाली, तर अनेकांची अर्धेअधिक घरे पाडण्यात आली होती. यामुळे पुन्हा या परिसरात रुंदीकरणाला कडाडून विरोध करण्यात आला. यांसह मंदिरालगत अनेक लहान बोळ असून, येथेही अनावश्यक व तुलनेने अधिक रुंदीकरण सुचविण्यात आल्याचे मत उपस्थितांनी नोंदवले. या रुंदीकरणासदेखील विरोध दर्शविण्यात आला.
दरम्यान, पंढरपूर कॉरिडॉरसाठी चौफाळा ते महाद्वार चौक हा रस्ता निवडण्याऐवजी चंद्रभागेचे वाळवंट किंवा 65 एकर परिसर निवडल्यास मोठय़ा जागेत कॉरिडॉर होऊ शकतो, अशी सूचना उपस्थितांनी मांडली; तसेच महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या पैलतीरावर 80 फूट रुंदीचा भव्य पूल बांधून यावरदेखील कॉरिडॉर उभारल्यास कोणीही विस्थापित न होता सुशोभीकरण व विकास होणार असल्याची सूचना मांडण्यात आली. या सूचना न स्वीकारल्यास लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन, उपोषण, मोर्चा काढून विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व प्रक्रियेसाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे.
बैठकीस वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर, माजी नगराध्यक्ष हरीश ताठे, पांडुरंग घंटी, पंढरपूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रा. पां. कटेकर, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, नाना कवठेकर, नरेंद्र डांगे, राजगोपाल भट्टड, कौस्तुभ गुंडेवार, नारायण गंजेवार, श्रीकांत हरिदास, राहुल परचंडे, डॉ. प्राजक्ता बेणारे, बाबा महाजन, ऍड. ओंकार जोशी आदी उपस्थित होते.





























































