
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिंधे गटाच्या वतीने पंढरपूरमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड गाजावाजा आणि भव्य-दिव्य प्रसिद्धी करून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात दिवभरात अवघ्या 10 जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी 50हून अधिक लोक उपस्थित होते. मात्र, रक्तदान न करताच केवळ उद्घाटन करून ही मंडळी निघून गेली.
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगर उद्योगसमूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावाने कार्यक्रम असल्याने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाने सडा-रांगोळी घालून मिंधे गटाच्या पदाधिकाऱयांचे स्वागत केले होते. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे म्हणजे किमान 500 जण तरी रक्तदान करतील, असा अंदाज बांधून रुग्णालयाने आवश्यक ती व्यवस्था केली होती.
सकाळी 11च्या सुमारास उद्घाटक आले आणि उद्घाटन करून गेले ते परत फिरकलेच नाहीत. आयोजकही थोडय़ाफार फरकाने गायब झाले. रक्तदान शिबिरात दिवसभर शुकशुकाट होता. दुपारी चार वाजेपर्यंत फक्त सहा लोकांनी रक्तदान केले होते. दिवसभर रक्तदात्यांची वाट पाहून डॉक्टरांनी आवराआवर सुरू केली, तेव्हा रक्तदात्यांचा आकडा 10वर पोहोचला होता.
दरम्यान, ही बातमी वाऱयासारखी शहरभर पसरल्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, शहरप्रमुख रवि मुळे, वंचित बहुजन आघाडी व कोळी समाजाचे अरुण कोळी आदींनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांकडे शहानिशा केली. वस्तुस्थिती खरी असल्याचा उलगडा झाल्यानंतर वरील सर्व पदाधिकाऱयांनी कार्यक्रमाचा फज्जा उडाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘हास्य आंदोलन’ करून मिंधे गटाच्या कार्यक्रमाची पोलखोल केली.




























































