क्रिकेटच्या वेडासाठी द्राक्षबाग काढून तयार केले क्रिकेटचे मैदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हौसेला मोल नाही म्हणतात ते उगाच नाही… पंढरपूरमधील अशाच एका अवलियाने आपल्या मुलाची हौस आणि हट्ट पुरवण्यासाठी पाच एकर द्राक्षबाग उखडून तिथे राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे ग्राऊंड उभारणीचे काम हाती घेतले आहे.

बाळासाहेब सूयर्वंशी असं या क्रिकेटवेड्या अवलिया शेतकऱ्याचं नाव आहे. कोरोनामुळे आपल्या लाडक्याचे क्रिकेट खेळण्याचे वांदे होऊ लागल्याने बाळासाहेबांनी स्वतःच्या शेतातच राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड उभारणीचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच एक क्षेत्रातील द्राक्षबाग ट्रॅक्टर लावून उखडून टाकली आणि तिथे ग्राऊंडचे काम सुरू केले.

बाळासाहेब यांचा मुलगा अभियश याला याला क्रिकेटची खूप आवड आहे. गेल्या चार वर्षांपासून तो विविध पातळ्यांवर क्रिकेट खेळतो आहे. कोल्हापूर येथील पेठ वडगाव येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा यश तेथेच क्रिकेट क्लबमधून तासन्तास प्रॅक्टिस करत होता. पण, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू झाल्याने त्याला पुन्हा गावी यावे लागले.

गावी आल्यावर सुविधा नसल्याने खेळात खंड पडू लागला. मग काय, यशने आपल्या पप्पांकडे ग्राऊंड उभारणीचा आग्रह धरला. क्रिकेट ग्राऊंड नसल्याने मुलाची कुचंबणा होत असल्याने बाळासाहेबांनी शेतातच ग्राऊंड निर्मिती सुरू केली आहे.

शेतातील द्राक्षबाग काढून संपूर्ण रानात अडीच फूट मरुळ मातीने भरून घेतली. सध्या कोरोनामुळे सर्व कामे बंद असल्याने घरातील वाहने आणि मशिनरी वापरून पाहता पाहता हे ग्राऊंड तयार झाले.

मग मुंबई येथून खेळपट्टी व ग्राऊंडवर लावायचे गवत (लॉन) आणून ते लावायचे काम सुरू केले आहे. सूर्यवंशी यांच्या ग्राऊंडवर सध्या 4 राष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या, 2 प्रॅक्टिस खेळपट्ट्या व दोन सिमेंट खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. येथे मजुरांकडून गवताचे लॉन तयार करण्याचे काम सुरू असून येत्या दोन महिन्यांत हे ग्राऊंड तयार होणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमचे पीच क्युरेटर महामुणकर यांनी थेट अनवली येथे जाऊन खेळपट्टीची पाहणी केली आणि व्यवस्थित झाल्याचे सांगितले आहे.

खेळपट्टी आणि ग्राऊंड तयार करायला आता ग्रामीण भागातील खेळाडू मोठ्या संख्येने येथे मदतीला येत असून ग्राऊंडवर गवत लावण्याचे काम असो किंवा रोलिंग करायचे. यासाठी हे खेळाडू मदत करत असतात.

सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश यंदा दहावीत असून गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्याकडून त्याने मॅचेस खेळल्या आहेत.

याचसोबत पुण्यात देखील क्लबकडून दोन स्पर्धा जिंकल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्या चेंडू फेकणाऱ्या मशीनवर यश सर्व करत असून नियमित फिटनेसचा व्यायाम करत आहे. येत्या दोन महिन्यांत ग्राऊंड तयार झाल्यावर येथे 14 आणि 14 वर्षांखालील मुलांची राज्यस्तरीय स्पर्धा भरवता येणार असून विठुरायाच्या पंढरीतील अनेक गुणी खेळाडूंना क्रिकेटमधील आपले प्रावीण्य दाखवण्यासाठी आता सुविधा उपलब्ध झाली आहे.