माघी वारीची चक्रीभजनाने सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात औसेकर फडाच्या चक्रीभजनाने माघी वारीची सांगता झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सांगता सोहळा संपन्न झाला.

वारकरी संप्रदायात भजन, कीर्तन व प्रवचनाबरोबरच चक्रीभजन करण्याची जुनी परंपरा आहे. पायात चाळ, गळ्यात विणा व हातात चिपळ्या घेऊन डिमडीच्या साथीने गोल फिरत चक्रीभजन केले जाते. या भजनात विठुरायाच्या नामात देहभान हरपून नृत्य केले जाते. सध्या, हातावर मोजण्याइतक्या घराण्यातच चक्रीभजनाची परंपरा सुरू आहे. औसा येथील वीरनाथ मल्लनाथ महाराज फडाने 225 वर्षांपासून ही परंपरा सांभाळली आहे.

माघी यात्रेची सांगता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चक्रीभजनाने करण्याची परंपरा आहे. त्यानुसार सभामंडप येथे गुरुबाबा महाराज औसेकर यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चक्रीभजन केले. यावेळी त्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्रीरंग महाराज औसेकर यांनी साथ दिली. दरवर्षी हजारो भाविक या भजनाचा आनंद लुटतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.