श्री विठ्ठल मंदिराचा डीपीआर करण्याचे काम सुरू, डॉ. निलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या मागणी नुसार श्री विठ्ठल मंदिराचा डीपीआर अर्थात सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम पुरातत्व विभागाने सुरु केले आहे. यासाठी पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 14 जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी याकामी विशेष बैठक घेऊन पाठपुरावा केला होता.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे काळानुरुप मंदिराच्या बांधकामात विविध बदल करण्यात आले आहेत. त्यात काही चुकीच्या कामांमुळे मंदिराचा काही भाग कमकुवत झाल्याचे काही घटनांवरून निदर्शनास आले होते. मंदिरावर लावण्यात आलेल्या वातानुकुलीत यंत्रणेमुळे मंदिराच्या छतातून पाणी ठिबकत होते. तर ठिकाणचे चिरे कोसळून भाविक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिराचे मजबुतीकरण करुन त्याचे सौंदर्य अधिक खुलवावे यासाठी मंदिर समितीने भारतीय पुरातत्व विभागाकडे डीपीआर तयार करुन देण्याची विनंती केली होती. मात्र या विनंतीला पुरातत्व विभागाने केराची टोपली दाखविली होती.

अनेक दिवस पाठपुरावा करुनही पुरातत्व विभाग दाद देत नसल्याने मंदिराचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही बाब शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिली. ढोले यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत निलम गोऱ्हे यांनी मंत्रालयात या विषयावर विशेष बैठक बोलावून दिल्ली, मुंबई आणि संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.

मंदिर समितीचे अधिकारी, सदस्य अन पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यात समोरासमोर चर्चा होऊन पुरातत्व विभागाने मंदिराचा डीपीआर तयार करुन देण्याचे मान्य केले. त्यानुसार 14 जणांचे पथक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे.  इन्फ्रारेड कॅमेऱ्याच्या साह्याने मंदिराच्या बांधकामाची तपासणी केली जात आहे या अद्यावत तपासणीमुळे भिंत्तीच्या आत कुठे पाणी झिरपते का भिंत कमकुवत झाली आहे का आदी बाबी निदर्शनास येणार आहे.

सदर डीपीआर मध्ये केवळ मंदिराचीच नव्हे तर देवदेवतांच्या मूर्ती सुस्थितीत आहेत का त्यावर कोणती प्रक्रिया करावी लागेल याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. श्री विठ्ठल मंदिर आणि मंदिराच्या परिवार देवतांची मंदिरांची सर्वंकष तपासणी केली जाणार आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे या पथकासोबत कार्यरत असून 40 दिवसांत हा आराखडा मंदिर समितीला सादर केला जाणार आहे त्यासाठी 27 लाख रुपये मंदिर समितीने पुरातत्व विभागाला मोजले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या