वारी होणार सुखकर, ‘वन वे’ मुळे गर्दीवर निघाला तोडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव महाद्वार समोर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी ‘वन वे ‘ वाहतूक सुरु केल्याने, भाविकांचा श्वास मोकळा झाला असून चेंगराचेंगरीतून सुटका झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

पंढरीची वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या प्रत्येक वारकरी भाविकांना ओढ असते ती श्री विठ्ठल व संत नामदेव महाराजांच्या पायरीच्या दर्शनाची. त्यामुळे मंदिर परिसरात वारीच्या काळात 24 तास मोठी वर्दळ पाहायला मिळते. देवाचे दर्शन करुन मंदिरात बाहेर पडलेले भाविक, चंद्रभागा स्नानासाठी जाणारे आणि येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी संत नामदेव महाराजांच्या पायरी समोर जमा होते.

एकाच ठिकाणी तिन्ही भाविकांची गर्दी एकत्रित येत असल्याने या ठिकाणी सतत चेंगराचेंगरी अन धक्काबुक्कीच्या घटना होत होत्या. भाविकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी डीवायएसपी विक्रम कदम यांनी संत नामदेव पायरी येथून ‘वन’ वाहतूक करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केल्याने, माघी वारीसाठी आलेल्या भाविकांची वारी सुखकर झाली आहे.