परमबीर सिंह फरारी घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांना किल्ला कोर्टाने अखेर आज फरारी घोषित केले आहे. परमबीर सिंह यांच्यावर असलेल्या इतर खटल्यांबाबत गुन्हे शाखेकडून कारवाई केली जाणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या गुह्याचा तपास क्राईम ब्रँच युनिट-11 करत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँचने त्या तिघांना चौकशीसाठी समन्स केले होते. तीन वेळेस समन्स करूनदेखील परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

न्यायालयाने त्या तिघांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. तपास अधिकारी हे परमबीर सिंह यांच्या मलबार हिल आणि चंदीगढ येथील घरी गेले होते. सिंह याच्या आचाऱयाकडेदेखील चौकशी केली होती. त्याने परमबीर यांच्याबाबत माहीत नसल्याचे सांगितले होते. तसेच विनयच्या कांदिवली येथील आणि रियाजच्या अंधेरी येथील घरी पोलीस गेले होते. मात्र त्या दोघांची माहिती पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी त्या सर्वांचे जबाब नोंदवले होते.

त्या तिघांच्या विरोधात फौजदारी दंड संहितेच्या कलम 82 व 83 अंतर्गत कारवाई करावी यासाठी गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी त्या अर्जावर युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर पोलिसांनी आजवर केलेल्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. पोलीस अधिकाऱयाने आजवर केलेल्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर केली. माहिती सादर केल्यानंतर आज किल्ला कोर्टाने परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंगला फरार घोषित केले.

…तर संपत्ती जप्त

फरारी घोषित केल्यानंतर मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांत न्यायालयाचा आदेश प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर त्या तिघांना न्यायालयात हजर राहावे लागेल. हजर राहिले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी गुन्हे शाखेच्या वतीने अर्ज दाखल केला जाईल. त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्या तिघांची संपत्ती जप्त केली जाईल.