परभणी जिल्ह्यातील सर्व शाळा 15 मार्चपर्यंत बंद

परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिले.

परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटीव्ह आले. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात सात मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश यापुर्वी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले होते. कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता सोमवार, 15 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश शनिवारी नव्याने देण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 15 मार्चपर्यंत बंद करण्यात येत आहेत. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग नियमित सुरू राहतील.

सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन तसेच अभ्यासगटाच्या माध्यमातून अध्यापनाचे कामकाज व आवश्यकती कामे करावीत. शिक्षण प्रक्रिया बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

इयत्ता दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कोविड-19 बाबत सर्व शासन परिपत्रकानुसार प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या