बलात्कार पीडितेचे मूल आमच्या ताब्यात द्या!  आरोपीच्या आई-वडिलांची सर्वोच्च न्यायालयात विचित्र याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाने केलेल्या बलात्कारातून जन्माला आलेल्या मुलाचा ताबा आम्हाला द्यावा, आम्ही त्याची योग्य ती देखभाल करू, अशी विचित्र याचिका आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला आली. या विचित्र याचिकेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले. सर्वोच्च न्यायालयात येणाऱया याचिकांची योग्य ती छाननी केल्यानंतर त्या सुनावणीसाठी याव्यात, सरसकट याचिका न्यायालयात येऊ लागल्या तर न्यायालयाचा अमूल्य वेळ फुकट जाईल, असे स्पष्ट  करत त्यांनी याचिका निकाली काढली.

सर्वोच्च न्यायालयात आज बलात्कारातून जन्माला आलेल्या मुलाचा ताबा मिळण्याठी याचिका सुनावणीला आली. वकिलाने बाजू मांडत सर्व माहिती दिली. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायाधीश नरसिंहा यांच्या खंडपीठाने वकिलाला चांगलेच झापले. खंडपीठ म्हणाले, तुम्ही काय म्हणता ते तुम्हाला तरी कळते का? अशा प्रकारची याचिका घेऊन तुम्ही कोर्टात येताच कसे? कोर्टाचा वेळ अमूल्य आहे. खंडपीठाने दोन मिनिटांत ही केस निकाली काढली. दरम्यान, सोशल मीडियावर या खटल्याची जोरदार चर्चा असून नेटकऱयांनीही संताप व्यक्त केला. तुम्ही पालनपोषण करून एका राक्षसाला मोठे केले आहे. त्याच राक्षसाने एक जीवन नष्ट केले आणि आता तुम्ही मुलाचा ताबा घेऊन त्याचे जीवन नष्ट करणार आहात. नवजात मुलाचा ताबा घेऊन आरोपी मुलाविरोधातील गुन्हा मागे घेण्यासाठी रचलेले हे कारस्थान आहे. याचिका निकाली काढणाऱया न्यायालयाचे आभार अशा भावना नेटकऱयांनी व्यक्त केली.