
पार्ले टिळक विद्यालयाची ‘शतकपूर्ती’ ही स्मरणिका आता मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावरही वाचता येणार आहे. शतकपूर्ती स्मरणिकेच्या ई-बुकचे औपचारिक प्रकाशन नुकतेच पार पडले असून गुगलच्या प्ले बुक्सवर ही स्मरणिका उपलब्ध आहे. त्यासाठीची लिंक संस्थेच्या संकेतस्थळावर दिली आहे. पार्ले टिळक विद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाटिवि असोसिएशनने ‘शतकपूर्ती‘ स्मरणिका प्रसिद्ध केली. या स्मरणिकेचे प्रकाशन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक हर्डीकर सर यांच्या हस्ते 9 जूनला झाले होते. शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांच्या महत्त्वपूर्ण सहभागातून ही स्मरणिका प्रसिद्ध झाली आहे. शाळेच्या शंभर वर्षांच्या रोमहर्षक वाटचालीचा धावता आढावा यात घेण्यात आला आहे. तर अनेक जणांनी आपल्या शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे हा अंक वाचनीय झाला आहे.


























































