वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली

पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे ‘संजय गांधी निराधार योजने’च्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. देवरे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे मला आत्महत्या करावीशी वाटते, अशी व्हिडीओ क्लिप व्हायरल केली होती. त्या घटनेची महिला आयोगामार्फत त्रिसदस्यीय समितीने चौकशीही केली. शेवटी देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

देवरे पारनेरला हजर झाल्यापासूनच अनेकदा वादग्रस्त ठरल्या होत्या. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या हजर झाल्या होत्या. त्याच वेळी त्यांनी केलेल्या विविध कारवायांच्या वेळीही त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. मात्र, त्यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले. मात्र, त्यांचे आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचे सूत कधीच जुळले नाही. त्यामुळे त्या सतत वादग्रस्त ठरल्या. त्यानंतर तहसील कार्यालयातील तलाठी मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. त्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आठ दिवसांनंतर चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.

नुकतीच त्यांची ‘मला लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करावीशी वाटते’ ही व्हिडीओ क्लिप राज्यभरात गाजली होती. त्यांनी या क्लिपमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांवरही आरोप केले होते. तसेच महिला आयोगाकडे याबाबत चौकशीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय महिला अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत देवरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव व्ही. यांनी देवरे यांच्या बदलीचा अदेश काढला आहे.

देवरेंच्या भ्रष्ट कारभाराची ‘लाचलुचपत’कडे तक्रार

तहसीलदार ज्योती देवरे यांनी पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी कारभारी भाऊसाहेब पोटघन (रा. जातेगाव, ता. पारनेर) यांनी ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना आज तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या