Manohar Parrikar गोव्यात कमळ फुलवणारे आणि पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानणारे पर्रिकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संघाच्या मुशीत घडलेले मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवले. परंतु एकदाही त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. गोवा जिथे चर्चचे वर्चस्व मानले जाते. तिथे संघाचे कार्यकर्ते पर्रिकर यांनी भाजपचे कमळ फुलवले होते.

गोव्यात भाजप म्हणजे पर्रिकर असे समीकरण निर्माण झाले होते. जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी आपल्या मायभुमी गोव्यातून निवडणूक लढवली. जेव्हा भाजपची गोव्यात सत्ता आली तेव्हा पर्रिकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

24 ऑक्टोबर 2000 मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु 27 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना काही कारणास्तव मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल. नंतर त्याच वर्षी 5 जून रोजी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

2005 साली भाजपचा गोव्यात पराभव झाला. तेव्हा विरोधी पक्षाचे नेतेही पर्रिकरच होते. 2005 ते 2012 या काळात गोव्यात काँग्रेसची सत्ता होती. 2012 साली पुन्हा निवडणुका होऊन भाजप सत्तेवर आली. तेव्हा पर्रिकरांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2014 साली जेव्हा केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताने सरकार आले तेव्हा त्यांना केंद्रात संरक्षणमंत्रिपदी बढती देण्यात आली. पर्रिकरांना राष्ट्रीय राजकारणात फार रस नव्हता. पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारण्यास पर्रिकर तयार होते. म्हणून त्यांनी संरक्षणमंत्रिपदी शपथ घेतली.

2017 साली जेव्हा गोव्यात भाजपच्या जागा कमी झाल्या. काँग्रेस सर्वाधिक जागा मिळून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तेव्हा पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तरच पाठिंबा देऊ अशी अट इतर पक्षांनी दिली. तेव्हाही पक्षाच्या आदेशावर पर्रिकर स्वगृही परतले होते.