बुरशीजन्य रोगांचा हैदोस, वर्षानुवर्षे जपलेल्या डाळिंबाच्या बागांवर कुऱ्हाड चालविण्याची शेतकऱयांवर वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डाळिंबावर पडलेल्या टिपक्या, तेल्या, मररोगांसह अन्य बुरशीजन्य रोगांनी गर्भगिरी पट्टय़ात अक्षरशः हैदोस घातला आहे. नऊ ते तेरा वर्षांच्या डाळिंबबागांवर यामुळे जड अंतःकरणाने कुऱहाड चालविण्याची वेळ डाळिंब उत्पादक शेतकऱयांवर आली आहे. डाळिंबाची झाडे मशिनरीने मुळासकट उपटून त्याचा चुरा करून प्रक्रिया उद्योगांसाठी त्याची निर्यात होत आहे. त्यामुळे डाळिंबबागा काढण्यासाठी शेतकऱयांना खर्च येत नाही. मात्र, अवघ्या काही तासांतच हिरवाईने नटलेला मळा उजाड झालेला पाहून बळीराजाचे डोळे पाणावत आहेत.

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी, मायंबा, सावरगाव, धामणगाव देवीचे, निवडुंगे, शिरापूर, पाणतासवाडी, करडवाडी, घाटशिरस ही गावे गर्भगिरी डोंगराच्या पट्टय़ात येतात. 20 वर्षांपासून ही गावे डाळिंब उत्पादनात अग्रणी आहेत. निवडुंगे येथील सतीश कोलते म्हणाले, दोनच एकर क्षेत्र आहे. त्यात नऊ वर्षांची बाग आहे. पाच वर्षांपासून विषम हवामानाने खर्चाची तोंडमिळवणीही होत नाही. कुटुंबचअडचणीत आले आहे. आशेने डाळिंब लावले. टँकरने जगविले. रोगांच्या अस्मानी संकटातून बाहेरच पडता येत नसल्याने डाळिंबाची बाग काढली आहे.

उपसरपंच सुवर्णा आप्पासाहेब मरकड यांनी चार एकरांतील अडीच हजार झाडे काढल्याचे सांगितले. प्रवीण गांधी, राम मरकड, कारभारी ससे, मच्छिंद्र अकोलकर, लक्ष्मण मरकड, सोमनाथ शिरसाठ आदी निवडुंगेतील शेतकऱयांनीही रोगकिडींनी त्रस्त होऊन डाळिंब बागा काढल्या आहेत.

मढीचे भगवान मरकड डाळिंब उत्पादनासह डाळिंब रोपांची विक्री करतात. ते म्हणाले, रोगकिडींचा वाढता उपद्रव, तुलनेत त्यास रामबाण उपाय ठरणाऱया औषधांची बाजारात वानवा आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांत नैराश्य आहे. पाणतासवाडीचे शंकर पाखरे यांनीही डाळिंब झाडे तोडून पारंपरिक हंगामी पिके घेण्याचा निर्धार केला आहे. कृषी विभागाच्या स्तरावरून या भागात तज्ञांची मार्गदर्शन शिबिरे घेणे, थेट बांधावर जाऊन शिवार संबोधन करणे, अशा बाबींचा अभाव आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱयांत नैराश्य आले आहे.

सरकारी यंत्रणेचे अस्तित्वही जाणवत नाही

z कीटकनाशकांना दाद न देणाऱया रोगकिडींचा वाढता प्रादुर्भाव, कृषी सेवा केंद्रांतून विक्री होणारी सुमार दर्जाची औषधे यामुळे खर्च करूनही उत्पादन येत नाही. यावर नियंत्रण ठेवणाऱया सरकारी यंत्रणेचे अस्तित्वही जाणवत नाही. याबाबत वेगळा लढा उभारण्याचा मनोदय डाळिंब उत्पादक शेतकऱयांनी व्यक्त केला आहे.