
पाथर्डी तालुक्यातील वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करत सुमारे 60 लाखांची वाहने जप्त केली. तालुक्यातील हनुमान टाकळी गावातून वाहणाऱया नानी नदीपात्र आणि साकेगाव-चितळी रस्त्यावर या कारवाया करण्यात आल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी गावातील नानी नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी दुपारी धाड टाकून नदीपात्रातून एक जेसीबी, एक ट्रक्टर असा एकूण वीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाळू चोरीसह पर्यावरण संरक्षण अधिनियम या कलमान्वये कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासळकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, संभाजी कोतकर, विनोद मासळकर यांनी केलेल्या कारवाईत बंडू शिवाजी बर्डे (वय 36, रा. हनुमान टाकळी), अक्षय दत्तात्रय मरकड (वय 20, रा. निवडुंगे), दिलीप शिवाजी वाढेकर (वय 32, रा. जोडमोहोज, ता. पाथर्डी) यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱयांच्या गौण खनिज पथकाने पाथर्डी तालुक्यातील साकेगाव – चितळी रोड दरम्यान परिसरात छापा टाकून मुरूम वाहतूक करणारे एक जेसीबी, चार ट्रक्टर आणि दोन डंपर असा एकूण सुमारे अंदाजे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या गौण खनिज पथकाला शुक्रवारी बेकायदा विनापरवाना मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे.
































































