हिंदुस्थानात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची हिम्मत पीसीबीमध्ये नाही, माजी पाक क्रिकेटरने सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ रझा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानातूनच टीका होऊ लागली आहे. हिंदुस्थान आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला नाही तर पाकिस्तान पुढील वर्षी हिंदुस्थानात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल, अशी धमकी रमीझ रझा यांनी बीसीसीआयला दिली होती. मात्र पीसीबी भ्याड असल्याचे सांगत पाकिस्तानचा माजी फिरकीपटूने रमीझ रझा यांना सुनावले आहे. आयसीसीच्या कोणत्याही इव्हेंटवर बहिष्कार टाकण्याचे धाडस त्यांच्यात नाही. असे त्याने म्हटले आहे.

दानिश कनेरिया म्हणाला की, “पीसीबीमध्ये आयसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची हिंमत नाही. पाकिस्तान हिंदुस्थानात खेळायला जाईल की नाही याची हिंदुस्थानला पर्वा नाही. पैसे मिळवण्यासाठी त्यांच्याकडे मोठी बाजारपेठ आहे. पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी हिंदुस्थानात गेला नाही तर त्याचा पाकिस्तानवरच मोठा परिणाम होईल. “पाकिस्तानचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी हिंदुस्थानात जाईल. त्यांच्यावर आयसीसीकडून दबाव आहे, त्यामुळे जाण्याशिवाय पर्याय नाही. आयसीसीच्या अशा स्पर्धांमध्ये न खेळण्याची चर्चा पाकिस्तान वारंवार करत असेल तर त्याचा त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होईल. असे कनेरियाने म्हटले आहे.

आशिया चषकाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, हिंदुस्थानी संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर घेण्याचा विचार केला जाईल. यावर कनेरिया म्हणाला की, “आशिया कपला अजून बराच वेळ बाकी आहे. तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक होईल की नाही, हे सांगता येणार नाही. तेव्हा परिस्थिती कशी असेल हे मला माहीत नाही. हिंदुस्थानसोबतच बांगलादेश आणि अफगाणिस्तानही पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार देण्याची शक्यता आहे.