मुंबई गोवा महामार्गावर डंपरच्या धडकेत एक ठार,ग्रामस्थांचा रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पेण

मुंबई गोवा महामार्गावर डंपरने मोटार सायकलला धडक दिल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला आहे. यशवंत घरत (60), रा. खारपाडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेऊन तीन तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला होता. जिते व खारपाडा गावातील स्त्रिया , तरुण वर्ग व ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने जमाव जमा झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. मृताच्या नातेवाईकांना 8 लाख रुपये व महिना 8 हजार रुपये देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना भेटल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता मोकळा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

मुंबई गोवा महामार्गावर सकाळी दहाच्या सुमारास जिते गावानजीक डंपरने (एमएच46 /एआर 5531) पुढे जाणाऱ्या यशवंत यांच्या मोटारसायकलला (एमएच 06 / बिवाय 198) मागून जोरदार धडक दिली. या धडकेत यशवंत जागीच ठार झाले .ते खारपाडा येथील रहिवाशी असल्याने अपघातानंतर खारपाडा येथील संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रास्ता रोको केला. मृतदेह डंपरखाली तसाच ठेऊन चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती.

मुंबई गोवा महामार्गावर अपघातानंतर जिते येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अलिबाग येथूनही पोलीस फौजफाटा मागविण्यात आला होता. मुंबई गोवा महामार्ग गावकऱ्यांनी रोखल्यामुळे तीन तास ठप्प झाला होता. मृताच्या नातेवाईकांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी महामार्ग मोकळा केला. मात्र अपघातामुळे प्रवाशांना मात्र तीन तास ताटकळत बसावे लागले होते.