
कोणताही व्यवहार न करता वैमानिकाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे वैमानिक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आला. त्यानंतर खात्यातून 4 लाख 91 हजार रुपये वळते झाले. कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याने त्यांना धक्काच बसला. तसेच त्यांनी कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता. खात्यातून पैसे गेल्याची माहिती बँकेला कळवण्यात आली. आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पंतनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.



























































