कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलन केंद्राला सुरुवात; 3 कर्मचाऱ्यांनी केले प्लाझ्मादान

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये शनिवारपासून प्लाझ्मा संकलन केंद्रास सुरुवात करण्यात आली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध नाही. तसेच त्याच्यावरील लसीची चाचणी सुरू आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळालेले कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय आहे. या थेरपीचा लाभ कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलनासाठी स्वतंत्र प्लाझ्माफेरेसिस युनिट साकारण्यात आले असून रक्तातून प्लाझ्मा घटकांचे विलगीकरण करणाऱ्या अद्ययावत यंत्रसामग्रीचीही उभारणी करण्यात आली आहे. या प्लाझ्मा संकलन केंद्राचे उद्घाटन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलमधील 3 कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मादान केले. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या