
सामना प्रतिनिधी । पुणे
प्लॅस्टिकबंदीमुळे काही उद्योगांना सुगीचे दिवस आले आहेत. रद्दी व्यवसाय त्यातलाच एक. प्लॅस्टिकबंदीचा विविध क्षेत्रांना फटका बसत असून, व्यावसायिक, विक्रेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना, रद्दी विक्रेत्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे लिफाफे, कागदी पिशव्या यांची मागणी वाढली असून, रद्दी भाव खाऊ लागली आहे.
प्लॅस्टिकवर बंदी येऊन आठवडा उलटला आहे. मात्र, तरीदेखील रद्दीच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पेपरची रद्दी भाव खाऊ लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे सुमारे ८० टक्के प्लॅस्टिक किरकोळ वापरातून बाद झाले आहे. कारवाईच्या भीतीपोटी व्यापारी कागदी पिशव्या, लिफाफे विकत घेण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे.
त्यामुळे पेपर रद्दी, कापडी पिशव्या अशा प्लॅस्टिकविरहित वस्तू मालाची ने-आण करण्याकरिता सर्वसामान्यांबरोबर छोट्या व्यापाऱ्यांच्या नियमित वापरात दिसू लागल्या आहेत. भाजीविक्रेते, फळविक्रेते, तीर्थप्रसाद, किराणा मालांची दुकाने, जनरल स्टोअर्स, हॉटेल्स, कापड दुकाने आणि मॉलमध्येदेखील पेपरच्या रद्दीचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांत १० ते १२ रुपये किलो दराने विकली जाणारी रद्दी आता २० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. इंग्रजी पेपरची रद्दी २५ ते ३० रुपये किलो दराने विकली जात आहे. दरम्यान, शहरी भागामध्ये मात्र किरकोळ दर वाढल्याची माहिती पुण्यातील रद्दी व्यापारी रवींद्र नर्बेकर यांनी दिली.
सरकारने किराणा माल विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांना प्लॅस्टिक वापरावर सूट दिली असली, तरीदेखील हे व्यावसायिक प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवी, कागदाच्या वापराला पसंती देत आहेत. यामुळे रद्दी कागदांचा वापर वाढला असून, जेथे शहरी भागामध्ये पेपर रद्दी सहज उपलब्ध होत असल्यामुळे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध होते; तर ग्रामीण भागात मात्र किलोचा भाव २० रुपयांवर पोहोचली आहे.
किरकोळ विक्रेत्यांकडून छोट्या विक्रेत्यांना ज्यांचे व्यवसाय खाद्यपदार्थांचे आहेत, त्यांना ८ ते १० रुपयांची वाढ करून रद्दी विकली जात आहे. रद्दी गोळा करणाऱ्या विक्रेत्यांनाही घाऊक व्यावसायिकांकडून दोन ते तीन रुपयांचा भाव वाढवून मिळाला आहे. हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीपाला, फळविक्रेते यांच्याकडून ग्राहकांना कापडी पिशवी वापरण्यासाठी जनजागृती करताना विक्रेते दिसत आहेत.
































































