हिंदुस्थान अंतराळातही ‘चौकीदार’, उद्ध्वस्त केला उपग्रह!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-new

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या जनतेला महत्वाचा संदेश दिला, या संदेशात त्यांनी हिंदुस्थान अंतराळ महाशक्ती झाल्याचे जाहीर केले. हिंदुस्थानचे नाव अंतराळ विज्ञानात नोंदवले गेले आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन हे देश अंतराळातील महाशक्ती होत्या. त्यात आता हिंदुस्थानचाही समावेश झाला आहे. हिंदुस्थान आता अंतराळ महाशक्ती असलेला चौथा देश ठरला आहे. आपल्या वैज्ञानिकांनी मिशन शक्ती ऑपरेशन यशस्वी केले आहे. लो अर्थ ऑरबिट या उपग्रहाला ए सॅट (अँटी सॅटेलाईट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट करण्यात आले. हे मिशन खूप कठीण होते. मात्र, आपण त्यात यश मिळवले आहे. या यशाने देशाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हा ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी मिळवलेल्या या यशाचा देशाला अभिमान आहे. कृषी, संरक्षण, विज्ञान यासह अनेक क्षेत्रात देशाला यश मिळाले आहे. ए सॅट मिसाइल देशाची सुरक्षा आणि सामर्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. या यशाचा उपयोग जागतिक शांततेसाठी करणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थानने आपल्या सामर्थ्याचा गैरवापर केलेला नाही. या यशाचाही विकासासाठी वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थान कधीही अंतराळातील शस्त्रास्त्र स्पर्धेत नव्हता. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग जनतेच्या हितासाठीच करण्यात येणार आहे. देशाचा आर्थिक विकास आणि प्रगतीसाठी तंत्रज्ञान गरजेचे आहे. देशाची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. जागिक शांतता अबाधित ठेवणे हेच आमचे ध्येय आहे. मात्र, देशाची सुरक्षितता महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काळाची गरज ओळखून दूरदृष्टीने विचार करण्याची आणि त्यादृष्टीने निर्णय घेण्याची गरज आहे. हे यश मिळवणाऱ्या वैज्ञानिक आणि संशोधकांचे यशाबाबत अभिनंदनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ट्वीट करत बुधवारी सकाळी 11.45 ते 12 वाजण्याच्या दरम्यान देशातील जनतेला महत्त्वाचा संदेश देणार असल्याची घोषणा केली होती. देशवासीयांनी हा संदेश टीव्ही, रेडिओ आणि सोशय मिडीयावर पाहवा असे आवाहन त्यांनी केले होते. देशाला संदेश देण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली होती. तसेच राष्ट्रीय सुरक्षा समितीचीही बैठक झाली होती.  आचार संहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला संदेश देण्याची घोषणा केल्याने याबाबत उत्सुकता होती.

पंतप्रधानांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे

  • आजचं हे परीक्षण कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियम किंवा तहाच्या विरुद्ध नाही. ते फक्त देशाच्या सुरक्षिततेसाठी असणार आहे.
  • हिंदुस्थान नेहमीच अंतराळात होणाऱ्या युद्धांविरुद्ध भूमिकेत राहिला आहे आणि या मिशननंतरही तीच भूमिका कायम राहील.
  • हे मिशन म्हणजे विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जाणाऱ्या हिंदुस्थानच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं पाऊल आहे.
  • मी आज संपूर्ण विश्वाला असं आश्वस्त करू इच्छितो की, आम्ही विकसित केलेलं हे तंत्रज्ञान कोणाच्याही विरुद्ध नाही.
  • एसॅट हा उपग्रह हा हिंदुस्थानच्या सुरक्षिततेला बळकटी देईल.
  • त्यामुळे उपग्रहांची सुरक्षितता हा एक तितकाच महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
  • भविष्यात अंतराळ आणि उपग्रह यांची व्याप्ती वाढतच जाणार आहे.
  • त्यामुळे शिक्षण ते संरक्षणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये या उपग्रहांच्या कामाचा फायदा होताना दिसत आहे.
  • आज आपल्याकडे पुरेसे उपग्रह उपलब्ध आहेत, जे विविध क्षेत्रांसाठी आपलं बहुमूल्य योगदान देत आहेत.
  • आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांवर अभिमान आहे.
  • या मिशनशी संबंधित सर्वांचे अभिनंदन
  • ही कारवाई हिंदुस्थानी बनावटीच्या उपग्रहाने करून दाखवली
  • सर्व हिंदुस्थानींसाठी ही गर्वाची गोष्ट
  • या कारवाईत अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आवश्यक होत, ते शास्त्रज्ञांनी सिद्ध करून ही कारवाई केली.
  • मिशन शक्ती नावाची ही कारवाई अत्यंत कठीण होती.
  • ही कारवाई फक्त तीन मिनिटांत पूर्ण करण्यात आलं.
  • हा उपग्रह आधीपासूनच लक्ष्य होता, त्याला एसॅट(अँटीसॅटेलाईट)ने नष्ट करण्यात आलं
  • काही वेळापूर्वीच आपल्या शास्त्रज्ञांनी अंतराळात 300 किलोमीटर दूर एलईओमध्ये एका लाईव्ह उपग्रहाला नष्ट केलं.
  • अशी नोंद करणारा हिंदुस्थान हा चौथा देश. यापूर्वी चीन, अमेरिका आणि रशिया हे तीन देश आहेत. अंतराळ महाशक्ती
  • हिंदुस्थानने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ
  • हा संदेश नेमका काय असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  • याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत माहिती दिली आहे.
  • हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी दुपारी 11.45 ते 12 च्या दरम्यान एक महत्त्वाचा संदेश देणार आहेत.