केंद्रात कृषीमंत्री असलेल्या राज्यातील वरिष्ठ नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? नाव न घेता पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad pawar narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. ‘शेतकरी महासन्मान मेळावा’ कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही व्यासपीठावर उपस्थित होते. अजित पवार यांच्यासमोरच नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहोत. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले जात आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले,असेही मोदी म्हणाले. ते जेव्हा कृषीमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना स्वत:च्या पैशांसाठीही दलालांच्या भरवशावर राहावे लागत होते. अनेक महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते, अशी टीकाही मोदी यांनी केली.

2014 च्या आधी तेलबियांची आणि कडधान्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 500 ते 600 कोटींची उत्पादने एमएसपीवर खरेदी केली जात होती. मात्र, आमच्या सरकारने तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1 लाख 15 हजार कोटी रुपये पाठवले आहेत. आमच्या सरकारने एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून राहवे लागत नाही, असेही मोदी म्हणाले.