पाच वर्षांत व्यवस्थेतील ‘खड्डे’ भरले, आता आकांक्षा पूर्ण करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात पुन्हा आमचे सरकार सत्तेवर आल्यावर देशाला लुटणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मै भी चौकीदार’ मोहिमेत तरुणांशी बोलताना दिली.

‘मै भी चौकीदार’ मोहिमेला पाठिंबा देणाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममधून संवाद साधला. या वेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील एका विद्यार्थिनीने मोदी यांना प्रश्न विचारला. अखेर आम्ही तुम्हालाच का मत द्यायचे, असा थेट सवाल तिने केला. पुढील पाच वर्षांत तुमचे सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा, या तिच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, आजवर देशातील व्यवस्थेतील खड्डे आम्ही भरून काढले आहेत. यापुढे लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करू.

विशेषत: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टांबाबत बोलताना आम्ही हे उद्दिष्ट 2022पर्यंत पूर्ण करू, असे मोदी म्हणाले. 2014 ते 2019पर्यंत आम्ही काही लोकांना तुरुंगाच्या दरवाजापर्यंत आणले आहे. येणाऱ्या काळात देशाला लुटणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, देशाची अर्थव्यवस्था आता सहाव्या स्थानावर आहे. देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 ट्रिलियन (खर्व) एवढी मजबूत करू. देशाची शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची बनवू, असे मोदी म्हणाले.

या वेळी मला 5 वर्षे देशाच्या व्यवस्थेतील खड्डे (त्रुटी) भरण्यात घालवावे लागले. आता पुढील 5 वर्षांत देशाची प्रगती गतिमान होण्यासाठी काम करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. बालाकोटमध्ये कारवाई झाल्याचे मान्य केले तर तेथे दहशतवादी तळ होता हे पाकिस्तानला मान्य करावे लागेल. त्यामुळे पाकिस्तान तेथे काहीच झाले नसल्याचा कांगावा करीत आहे. माझ्या सैन्यावर माझा विश्वास आहे. म्हणून मी एअर स्ट्राईकचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस, पूनम महाजन आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते.