शेतकऱ्याच्या दशक्रियाविधीचं मोदींना आमंत्रण; मंत्री, खासदार, आमदारांनाही घेऊन येण्याचा आग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज दुपारी नाशिक येथे त्यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि युवा महोत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर ते मुंबईमध्ये येणार असून त्यांच्या हस्ते ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण होणार आहे. या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा असताना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या दशक्रियाविधीसाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. याची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही पत्रिका शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ही पत्रिका एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर केली आहे. यात ते म्हणातात, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज आपण महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहात. मोठमोठ्या कार्यक्रमांचे आमंत्रण तुम्ही लगेच स्वीकारता, हा कार्यक्रम तसा आनंदाचा किंवा जाहिरातबाजी करणारा नाही. तरी पण आशा करतो की, तुम्ही आमंत्रण स्वीकाराल. हे आमंत्रण आहे जरुडमधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे… त्यांच्या एका बांधवाच्या आत्महत्येनंतरच्या दशक्रिया विधीचे!

अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील जरुडचे पद्माकर दारोकर हे संत्रा उत्पादक शेतकरी. दीड एकरात त्यांनी बाग फुलविली. यंदाच्या हंगामात अचानक फळगळती सुरू झाली. बांगलादेशातील संत्रा शुल्कवाढीमुळे निर्यात प्रभावित झाली. संत्र्याचे भाव कोसळले. मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला.

हाडाचा शेतकरी. शेत सोडून कसा जगणार? विवंचना वाढू लागली. शेवटी विहिरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आपल्या प्रश्नांचा गुंता असा टोकाचा निर्णय घेऊन सोडविला. आज, 12 जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. गावकऱ्यांनी पत्रिका छापून तुम्हाला निमंत्रण दिले आहे. आपण महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्याल ही त्यांची भाबडी आशा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

‘शेतकऱ्यांचे कैवारी’ म्हणून तुम्ही आणि तुमचा पक्ष माध्यमांमध्ये मिरवतो. टीव्हीवर 24 तास जाहिराती चालतात. हे बघता आज तुम्ही आमच्या या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट नक्की घ्याल, ही आशा करतो..! कांदा, कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकरी सुद्धा आपली वाट बघत आहेत की तुम्ही त्यांच्या “मन की बात” ऐकाल, असा टोलाही त्यांनी लगावला.