मुलायम सिंह यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यांदव यांचे सोमवारी सकाळी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधानवर राजकीय स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख व्यक्त करत त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी तीन ट्विटमधून मुलायम सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

” मुलायम सिंह यादवजी हे एक उमदे व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी लोकनायक जय प्रकाश आणि डॉक्टर लोहीया यांच्या विचारांचा प्रसार करत लोकांची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. मुलायम सिंह यादव यांचे उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात वेगळे स्थान होते. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीसाठी लढत होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त हिंदुस्थानासाठी त्यांनी काम केले होते. त्यांचे संसदीय काम अभ्यासपूर्ण होते आणि त्यांनी कायम राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ट्विटमध्ये म्हटले आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंह यादव यांच्याशी माझं बऱ्याचदा बोलणं व्हायचं. त्यामुळे त्यांचा जवळचा सहवास लाभला. मी नेहमीच त्यांची मते विचार ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांच्या निधनाने मला प्रचंड दुख होत आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि लाखो समर्थकां प्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती”, असे ट्विट मोदींनी केले आहे.