
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली असून प्रचारानेही वेग पडकला आहे. या प्रचारसभांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी लगावला आहे. परंतु गृहमंत्री राजीनाथ सिंह यांनी पंतप्रधानांवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीमध्ये लोकांचे लक्ष्य भरकटवण्यासाठी विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. तसेच पत्नी ना मुलगा, पंतप्रधान कोणासाठी भ्रष्टाचार करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
टीव्ही 9 भारतवर्षच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, बऱ्याच काळापासून लोकांनी पंतप्रधानांना राजकारणामध्ये सक्रिय असल्याचे पाहिले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी सर्वस्व झोकून काम केले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराची एकही डाग नाही. आणि सर्वात महत्त्वाचे ते भ्रष्टाचार कोणसाठी करतील? कोण आहे त्यांच्या मागे? पत्नी ना मुलगा, कोणीच नाही. संपूर्ण देशच त्यांचे कुटुंब आहे. अशा व्यक्ती शुद्धच असणार ना, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
विरोधकांकडून राफेल कराराप्रकरणी सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला गेला आहे. मोदींनी राफेल कराराच्या आडून अनिल अंबानी यांच्या खिशात हजारो कोटी टाकल्याचा आरोप विरोधकांना केला आहे. हे सर्व आरोप राजनाथ सिंह यांनी फेटाळले आहे.




























































