पंतप्रधानांच्या चार तासांच्या रॅलीसाठी मध्य प्रदेश सरकार करणार 23 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने मध्य प्रदेशमध्ये 15 नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ दौरा करणार असून जनतेला संबोधित करणार आहेत. या संपूर्ण सोहळ्यासाठी 23 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर हा आठवडा जनजातीय गौरव सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट मंडळाने घेतला आहे. त्या निमित्ताने भोपाळ येथील जंबोरी मैदानात पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. या सोहळ्यासाठी 2 लाख आदिवासी जमा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दरम्यान भोपाळमध्ये चार तास असतील आणि सव्वा तास मंचावर थांबतील. या कार्यक्रमासाठी सुमारे 23 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. यातील 13 कोटी निव्वळ लोकांची गर्दी जमवण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

यातील 12 कोटी या लोकांचा प्रवास, जेवण आणि राहण्याच्या सोयीसाठी वापरले जातील. लोकांना मुक्काम करण्यासाठी पाच मोठे तंबू उभारले गेले आहेत. त्यांच्या सजावटीसाठी, प्रचारासाठी देखील 9 कोटी खर्च करण्यात येतील, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.