
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 एप्रिलला पहिली प्रचार सभा वर्ध्यात घेणार आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व नेत्यांच्या राज्यभरात एक हजार सभा होणार असून शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली.
भाजप नेते-शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या प्रचार सभांची माहिती दिली. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानाबाबत प्रसिद्धीमाध्यमांतून आलेल्या वृत्ताबाबतही स्पष्टीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असून त्यांच्या सभा होणार आहेत. त्यापैकी पहिली सभा ही वर्ध्यातून होणार असल्याचे केशव उपाध्ये यांनी सांगितले.






























































