
कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा चौथा स्मृतिदिन 30 डिसेंबर रोजी आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पाडगावकरांचे स्मरण केले जाईल. मात्र त्या दिवशी वेंगुर्ले येथील प्रस्तावित स्मारकाच्या कामाचा शुभारंभ करावा हीच पाडगावकरांना खरी श्रद्धांजली असले, अशा भावना साहित्यप्रेमी व्यक्त करीत आहेत. जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणार्या पाडगावकरांच्या स्मृती चिरंतन ठेवणार्या आणि नव्या पिढीपर्यंत त्या पोहचवणार्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सागरेश्वर वेंगुर्ले येथे एमटीडीसीच्या मालकीची जागा आहे. जागेवर पाडगावकरांचे स्मारक उभारण्यात येत आहे. ही जागा पाडगावकरांचे जन्मगाव उभादांडा या वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत आहे. त्यासाठी एमटीडीसीने 1 कोटी 65 लाखांचे अंदाजपत्रक केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीने आर्थिक तरतूद केली आहे
सरकारी लाल फितीतील कारभाराचा फटका पाडगावकरांच्या स्मारकाला बसलाय. गेल्या वर्षभरात स्मारक उभारण्याच्या दृष्टीने हालचाली झाल्या नाहीत. केवळ कागदी घोडे नाचवले गेले आहेत. पर्यटन विभागाची चालढकल सुरू आहे. या विभागाचे अधिकारी ‘निधी आहे, पण मंत्र्यांचे आदेश नाहीत’ असे सांगत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीने 75 लाखांचा धनादेश दिल्यालाही अनेक महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण अधिकार्यांना मिळाले. आता राज्यात नवे सरकार आले आहे. नव्या सरकारने स्मारकाच्या कामाच्या शुभारंभ, पाडगावकरांच्या पुण्यतिथीला म्हणजे 30 डिसेंबर रोजी करावा, अशी अपेक्षा सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अतुल हुले यांनी केले असून तसेच पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
चिरंतन स्मृतींचा ठेवा
पाडगावकरांच्या स्मारकाचा आराखडा एमटीडीसीने तयार केला आहे. थीम पार्क असे त्याचे स्वरूप आहे. पाडगावकरांचा पुतळा, कवितांची शिल्पे, पुस्तक शिल्प व बालोद्यान हे सगळं एका ऍम्पी थिएटरमध्ये असेल. सुमारे 125 रसिक बसतील अशी या थिएटरची आसन व्यवस्था असेल. शेजारीच एमटीडीसीचे माहिती केंद्र असेल. त्यात पाडगावकरांची साहित्यसंपदा, त्यांची छायाचित्रे, त्यांना मिळालेले पुरस्कार यांची मांडणी केली जाईल.




























































