पोलीस दवाखान्यातील डॉक्टरांना ग्रामीण भागात पाठवणार, आरोग्य संचनालयाची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतल्या पोलीस दवाखान्यातील डॉक्टरांची रवानगी राज्याच्या ग्रामीण भागात करण्याचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य संचालनालयाने तयार केला आहे. त्यामुळे मुंबईतल्या पोलीस वसाहतींमधील 12 दवाखाने बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी पोलिसांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. मात्र पोलीस दवाखान्यातील डॉक्टरांना ग्रामीण भागात पाठवण्यास गृह विभागाने कडाडून विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे आरोग्य संचालनालय व गृह विभागात शीतयुद्ध निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत पोलीस आयुक्त कार्यालयापासून दादर, वरळी, ताडदेव, डी. बी. मार्ग, अंधेरी, मरोळ, कुर्ला-नेहरूनगर, कांदिवली, सांताक्रुझ, माहीम व पंतनगर पोलीस वसाहतींमध्ये पोलिसांसाठी दवाखाने आहेत. त्याशिवाय मुंबई उच्च न्यायालय, सेशन कोर्ट, राजभवन, ओल्ड कस्टम हाऊस, मंत्रालय आदी महत्त्वाच्या इमारतींमध्येही दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये 63 डॉक्टर्स आहेत. पोलीस वसाहतींमधील पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस दवाखान्यांचा मोठा फायदा होतो. पोलीस दवाखाने व इतर ठिकाणच्या डॉक्टरांची भरती आरोग्य विभागामार्फत होते, मात्र या डॉक्टरांचा पगार गृह विभागामार्फत दिला जातो.