उपायुक्तांच्या परवानगीनेच पोक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनयभंग अथवा पोक्सो गुह्याच्या माध्यमातून निर्दोष व्यक्तीवर कारवाई होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुश्मनी काढण्याच्या हेतूने या गुह्यांचा गैरवापर होत असल्याने हा प्रकार थांबण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. आधी तक्रारीची आवश्यक शहानिशा केल्यानंतर तथ्य असल्यास वरिष्ठांच्या शिफारशीनुसारच गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.

जुने भांडण, प्रॉपर्टीचा वाद, पैशांची देवाणघेवाण अथवा वैयक्तिक कारणांवरून पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत किंवा विनयभंगाची तक्रार करण्यात येते. अशा गुह्यांत कोणतीही शहानिशा न करता आरोपीस तत्काळ अटक केली जाते. तपासादरम्यान सदर तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीस कलम 169सीआरपीसीअंतर्गत डिस्चार्ज करण्याची कारवाई केली जाते. परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अशा गुह्यांत अटक झाल्यामुळे संबंधित व्यक्तीची नाहक बदनामी होते, समाजात त्याच्या प्रतिष्ठsला धक्का बसतो व त्या व्यक्तीचे वैयक्तिक नुकसान होते. असे प्रकार घडू नये व अशा गोष्टींना आळा बसावा यासाठी उपायुक्तांच्या परवानगीनंतरच गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला
पोक्सो अथवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस उपआयुक्त यांनी परवानगीचा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.