पोलीस डायरी : भ्रष्टाचारात आघाडीवर कोण? नकली दारूचा महापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँच युनिट क्रमांक 10 चा पोलीस निरीक्षक आनंद सीताराम भोईर (43) हा एका वाईन शॉपच्या मालकाकडून लाच घेताना पकडला गेला. तब्बल दोन दशकांनंतर मुंबई प्रकटीकरण शाखेचा एक पोलीस अधिकारी (2019 सालाच्या पहिल्याच दिवशी) ट्रप झाल्याने मुंबई क्राइम ब्रँचमध्ये खळबळ उडाली. डी. शिवानंदन हे 1998 साली मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त होते तेव्हा चेंबूर येथील क्राइम ब्रँचच्या एका अधिकाऱयाला लाच घेताना ऍण्टीकरप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर कधी डिटेक्शन क्राइम ब्रँचच्या अधिकारी अथवा कर्मचाऱयांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कुणी तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. असो. कुठे तरी एखादा नासका आंबा निघणारच! सहा महिन्यांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी आधीची पोलिसांमधील मरगळ झटकून काम सुरू केले होते. बऱयाच केसेस डिटेक्ट करण्यात डुंबरे यांना यश आले असतानाच भोईर नावाच्या भ्रष्ट अधिकाऱयाने डिटेक्शन क्राइम ब्रँचची प्रतिमा मलीन करून टाकली. आशुतोष डुंबरे हे पोलीस दलात एक प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांना या दुःखद घटनेचा प्रचंड धक्का बसला. सारी पोलीस कारकीर्द ठाणे ग्रामीणमध्ये घालविलेल्या व कामाऐवजी केवळ पैसा कमविणे हेच अंतिम ध्येय असलेल्या आनंद भोईर या अधिकाऱयाने मुंबई क्राइम ब्रँचमधील मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांवर राजकीय दबाव आणला होता. अखेर व्हायचेच तेच झाले. आनंद भोईरचा अतिलोभापायी बळी गेला. स्कॉचसारख्या नकली परदेशी दारूची कुलाबा येथील आपल्या (अर्धा डझन) वाईन शॉपमधून विक्री करणाऱया वाईन शॉपमालकाच्या मुलाला अटक करून भोईरने पुढील कठोर कारवाई न करण्यासाठी 25 लाखांची लाच मागितली व 22 लाखांची लाच स्वीकारताना हा अधिकारी 1 जानेवारी रोजी अंधेरी पोलीस ठाण्याच्या बाहेर पकडला गेला.

मुंबईसह देशभरात रोज कुणी ना कुणी लाच घेताना पकडला जातो. परंतु साऱया जगात नावलौकिक मिळविलेल्या मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँचचा अधिकारी लाच घेताना पकडला जाणे हे कुणालाही न पचण्यासारखे आहे. गेल्याच आठवडय़ात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना 1 कोटी रुपयांची लाच घेताना ऍण्टीकरप्शनच्या अधिकाऱयांनी अटक केली. त्याआधी पुण्यातून 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी अटक केली. त्यामुळे भ्रष्टाचार हा कधीही न संपणारा विषय आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रचलेल्या 891 सापळय़ांत 1 हजार 181 लोकसेवकांना अटक करण्यात आली. त्यात 274 महसूल व 262 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा समावेश आहे. हे मात्र चिंताजनक आहे. महसूल विभागाचे सचिन डोंगरे व पोलीस दलातील आनंद भोईर यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱयांमुळे ही खाती आज बदनाम झाली आहेत. दरवर्षी भ्रष्टाचारात महसूल विभागाचे अधिकारीच आघाडीवर असतात. त्यांचेच अधिकारी व कर्मचारी ‘भ्रष्टाचारात कोण पुढे’ ही ऍण्टीकरप्शनची ढाल पटकवतात. दरवर्षी विजेता संघ महसूल व उपविजेता संघ पोलीस असतो! या दोन संघांचा पैसे खाण्याचा विक्रम अद्याप कुणीही मोडलेला नाही. महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, शिक्षण व वन विभागामध्येही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार आहे. परंतु ऍण्टीकरप्शनच्या सापळय़ात मोठय़ा प्रमाणात महसूल व पोलीसच अधिक सापडत आहेत हे चित्र कधी बदलेल असे वाटत नाही.

पोलीस निरीक्षक आनंद भोईर याला कुलाबा येथील एका इसमाची पाच-सहा वाईन शॉप असून तेथे बनावट देशी-विदेशी बाटल्यांची विक्री केली जाते अशी खबर मिळाल्यानंतर तेथे भोईरने छापा मारला असता खरोखर त्या ठिकाणी महागडय़ा अशा स्कॉच बाटल्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले. मग मुंबईतील अबकारी खात्याचे अधिकारी काय करीत होते? असा प्रश्न पडतो. मुंबईसारख्या ठिकाणी नकली दारू विकण्याचे धाडस वाईन शॉपवाले करतात त्यावरून अबकारी खात्यात किती भ्रष्टाचार आहे हे दिसून येते. तेव्हा मद्यप्रेमींनी कोणत्याही वाईन शॉपमधून दारू विकत घेण्यापूर्वी मालकाच्या व चालकाच्या चारित्र्याची, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती करून घेणे आवश्यक आहे. हायवेवरील बहुसंख्य वाईन शॉपमध्ये तर मोठय़ा प्रमाणात नकली दारूच्या बाटल्यांचीच विक्री केली जाते. नकली दारूचा महापूर महामार्गावरच असतो असे बोलले जाते. राज्यकर्त्यांच्या, शासकीय अधिकाऱयांच्या आशीर्वादाशिवाय कुणीही वाईन शॉपमालक नकली दारू विकण्याचे धाडस करणार नाही. भ्रष्टाचाराची हीच खरी ‘मुळं’ आहेत. आज ओरिजिनल दारू मिळण्याचे वाईन शॉप शोधावे लागतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रामाणिक वाईन शॉप व हॉटेलवाले आहेत. बाकी सर्वच नकली! अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले म्हणून पोलीस निरीक्षक आनंद भोईर याने वाईन शॉपवाल्याला धडा शिकवला, परंतु तो त्याच्या अतिलोभामुळे अंगाशी आला. काहीही कर्तृत्व न दाखविता आपल्या अधिकाराचा गैरवापर करून झटपट श्रीमंत होण्याचे आनंद भोईरसारख्या अधिकाऱयांचे स्वप्न असे धुळीला मिळते. भोईरची ठाणे ग्रामीणमध्ये कोटय़वधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. हॉटेल व रिसॉर्ट आहेत. आता ती काय कामाची? ऍण्टीकरप्शनची एकदा चौकशी मागे लागली की त्यातून कुणाची सुटका नाही, हे भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱयांनी लक्षात असावे