तरुणीच्या मदतीला धावली खाकीतली ‘दुर्गा’, माटुंग्याच्या अंमलदार महिलेमुळे मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसऱ्याच्या दिवशी घरदार सोडून निघून गेलेल्या एका 18 वर्षांच्या मुलीच्या मदतीला महिला पोलिसाच्या रूपाने साक्षात ‘दुर्गा’च धावली. ‘फोनवर सारखी बोलते’ म्हणून वडील ओरडल्याने ती घर सोडून निघाली, पण त्या विद्यार्थिनीची तगमग सारिका उबाळे या महिला पोलिसाने टिपली. मग लोकल प्रवासातच तिला विश्वासात घेऊन तिची माहिती काढली व तिची सुखरूप घरवापसी केली. सारिका यांच्यामुळे एका तरुणीच्या आयुष्यात येऊ घातलेला मोठा अनर्थ टळला.

माटुंगा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सारिका उबाळे या महिला अंमलदार वासिंद येथे राहतात. आज सकाळी सारिका सीएसएमटी लोकलने कामावर येण्यासाठी निघाल्या. ठाणे रेल्वे स्थानक सोडल्यानंतर डब्यात बसलेल्या एका मुलीकडे त्यांची नजर गेली. ती मुलगी रडून बेहाल झाली होते. सारिका त्या मुलीजवळ गेल्या. त्यांनी तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पण उपाशी, अपूर्ण झोप, त्यात रडून तिला अशक्तपणा आल्यामुळे तिला नीट बोलता येत नव्हते. ऐन तारुण्यात आलेली मुलगी अशा अवस्थेत का आणि ती कुठे चालली असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. मग सारिका यांनी आपल्या पोलिसी कौशल्याने तिला मायेचा आधार देत बोलते केले. तेव्हा शिवानी यादव (18) असे नाव असून कळव्याला राहत असल्याचे तिने सांगितले. फोनवर बोलते म्हणून वडील ओरडले आणि त्याच रागात घरातून बाहेर पडल्याचे तिने सांगितले.

अशा परिस्थितीत शिवानीला एकटीला सोडणे धोक्याचे होईल ही बाब लक्षात घेऊन सारिका यांनी तिला दादर स्थानकात उतरवले. मग स्थानकासमोरील बीट चौकीत नेऊन पोलीस निरीक्षक केशव वाघ व अन्य कर्मचाऱ्यांनी तिला खाऊ-पिऊ घातले आणि आपुलकीने तिला बोलते केले. तिने तिची सर्व कहाणी सांगितल्यावर नेमका प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.

बाप-लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला
शिवानी बेपत्ता झाल्याने तिचे पालक हैराण झाले होते. अशातच आज दुपारी माटुंगा पोलिसांचा तिचे वडील बसंत यादव यांना फोन गेला आणि तुमची मुलगी सुखरूप असून तिला न्यायला या, असे सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता माटुंगा बीट चौकी गाठली. एकमेकांना बघून बाप-लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला.