
भुशाच्या गोण्यांच्या आडून गांजाची तस्करी करणारा टेम्पो लोणी पोलिसांनी पकडला आहे. यामध्ये 510 किलो गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे गांजा तस्करीचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता असून पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी दिली. राहुल बाबासाहेब पवार (वय 32) व दत्ता मारुती चव्हाण (वय 35, दोघे रा. जामखेड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे पथकासह रात्रीची गस्त घालून येत असताना लोणी येथील इंजिनीअरिंग कॉलेजजवळ त्यांना एका टेम्पोचा संशय आला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये पुढील भागात भुसा भरलेल्या गोण्या होत्या. मात्र, उग्र वास आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. तेथे टेम्पोतील दोघांनी टेम्पोत गांजा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी टेम्पोतून 20 गोण्यांमध्ये असलेला 510 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 75 लाख रुपये आहे. गांजा आणि टेम्पो असा सुमारे 80 लाखांचा मुद्देमाल लोणी पोलिसांनी जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी, संपत जायभाय, सहायक फौजदार बाबासाहेब लबडे, पोलीस नाईक दीपक रोकडे, कैलास भिंगारदिवे, संभाजी कुसळकर, मनोज सनानसे, संतोष लांडे, बाबासाहेब सांगळे, कॉन्स्टेबल सोमनाथ वढणे, पी. एम. शिंदे, पी. एम. इंगळे या पथकाने ही कारवाई केली.





























































